01.: दिवंगत शासकीय कर्मचारी त्याच्या मृत्यूच्या वेळी गट अ, ब (राजपत्रित/ अराजपत्रित) पदावर कार्यरत असतील तर त्याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होईल का ?
उत्तर : शासन निर्णय सा. प्र. विभाग, दि. २२/८/२००५ मधील परिच्छेद २ नुसार केवळ शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट क व ड मधील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांनाच अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू होते. गट अ, ब (राजपत्रित / अराजपत्रित) या पदावर कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होत नाही. (शा. नि., सा. प्र. विभाग, दि. १७/७/२००७ मधील तरतुदींनुसार गट अ, ब, क, ड मधील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याचा नक्षलवादी / आतंकवादी / दरोडेखोर / समाजविघातक यांच्या हल्ल्यात / कारवाईत मृत्यू झाल्यास अशा अधिकारी / कर्माऱ्याच्या पात्र वारसदारास अनुकंपा नियुक्ती लागू)
02.कर्मचारी गट “क” मध्ये कार्यरत असेल तथापि गट “ब” (राजपत्रित/ अराजपत्रित) पदाची वेतनश्रेणी लागू असल्यास त्याच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू होईल का ? कर्मचारी गट “क” मधील पदावर कार्यरत असल्याने त्याच्या पात्र वारसदारास अनुकंपा नियुक्ती लागू होईल.
03.गट “क” मधून गट “ब” अराजपत्रित / राजपत्रित पदावर तात्पुरती नियुक्ती दिल्यास त्या कर्मचाऱ्याच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती लागू होईल का ?
गट “ब” मधील पदावर कर्मचाऱ्यास तात्पुरती नियुक्ती दिली असली तरी ही त्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होणार नाही.
04.अनुकंपाधारकांच्या प्रतिक्षासूचीमध्ये असताना वयाची ४०/४५ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांचे नाव या प्रतिक्षासूचीतून वगळल्यावर त्याने संमत्तीपत्र दिल्यास त्याच्याऐवजी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील अन्य पात्र वारसदाराचे नाव या प्रतिक्षासूचीत समाविष्ट करता येईल का ?
अनुकंपा नियुक्ती हा वारस हक्क नाही. सबब एका उमेदवाराचे नाव वयोधिक्यामुळे अनुकंपाधारकांच्या प्रतिक्षासूचीतून वगळल्यास त्याच्याऐवजी अन्य वारसदाराचे नाव अनुकंपाधारकांच्या प्रतिक्षासूचीमध्ये घेता येणार नाही.
05.स्वेच्छानिवृती / नियत वयोमानानुसार सेवानिवृत / रुग्णतेच्या कारणास्तव सेवानिवृत / सक्तीने सेवानिवृत केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती लागू होईल का ?
शा. नि., सा. प्र. विभाग, दि. २२/८/२००५ नुसार केवळ शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती लागू आहे. त्यामूळे स्वेच्छानिवृती / नियत वयोमानानुसार सेवानिवृत/रुग्णतेच्या कारणास्तव सेवानिवृत / सक्तीने सेवानिवृत केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती लागू नाही.
06.बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती लागू आहे का ?
बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती लागू नाही. तथापि बेपत्ता कर्मचा-याचा मृत्यू झाल्याचे सक्षम न्यायालयाकडून ज्या आदेशान्वये घोषित केले असेल त्या आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत बेपत्ता कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबीयांनी अनुकंपा नियुक्तीसाठी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर केल्यास त्यांना अनुकंपा नियुक्ती लागू होईल.
07.आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांस अनुकंपा नियुक्ती लागू आहे का ?
सध्याच्या अनुकंपा नियुक्ती धोरणात कर्मचा-याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला असल्यास त्याच्या कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती लागू होईल याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. सबब आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या पात्र वारसांनाही अनुकंपा नियुक्ती लागू होईल.
08.दिवंगत कर्मचाऱ्यास दोन पत्नी असल्यास आणि त्याच्या मृत्यूनंतर २/३ जणांनी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज सादर केल्यास त्यापैकी कोणास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय होईल ?
अशा वेळी सक्षम न्यायालयाकडून कायदेशीर वारसदार असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणा-या उमेदवारास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय होईल.
09.दिवंगत कर्मचाऱ्यास एक / दोन मुले असल्यास अथवा दोनपैकी एकाचा मृत्यू झाला असल्याने त्याच्या पत्नीने ( कर्मचाऱ्याच्या सुनेने) अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज सादर केल्यास तिला अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होईल का ?
शा. नि., सा. प्र. विभाग, दि. २३/८/१९९६ व २/५/२००१ नुसार कर्मचा-याचा मुलगा हयात नसल्यास व त्या कुटुंबात अनुकंपा नियुक्तीसाठी अन्य कोणी पात्र उमेदवार नसल्यास त्या कर्मचा-याची सून अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरते. सबब प्रश्नात नमूद परिस्थितीत कर्मचा-याची सून अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
10.दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबात फक्त विवाहीत मुलगी/मुली असतील तथापि दिवंगत कर्मचा- याची पत्नी / पती हयात नसेल तर त्याच्या विवाहीत मुलींना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय राहील काय ?
दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबात फक्त विवाहीत मुलीच असतील तर त्याचे कुटुंब त्या विवाहीत मुलीवर अवलंबून आहे असे म्हणता येणार नाही. सबब त्या विवाहीत मुलींना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय नाही.
11.मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती पूर्वीच शासकीय / निम शासकीय सेवेत असेल व ती त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना आधार देत नसेल या सबबीवर अन्य पात्र कुटुंबीयाने अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज सादर केल्यास त्याला अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय होईल का ? शा. नि., सा. प्र. विभाग, दि. २६/१०/१९९४ नुसार अशा प्रकरणात त्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे किंवा नाही व नोकरीस असलेली व्यक्ती कुटुंबातील अन्य सदस्यांना आधार देते आहे किंवा नाही याबाबत सखोल तपासणी करुन नियुक्ती प्राधिका-यांनी निर्णय घ्यावा. तथापि अनुकंपा नियुक्ती ही दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना सहानुभूती म्हणून दिली जात असून याचा गैरवापर होणार नाही याबाबत नियुक्ती प्राधिका-यांनी काळजी घ्यावी.
12.दिवंगत शासकीय कर्मचा-यास ३ अपत्ये असल्यास त्याच्या पात्र वारसदारांना अनुकंपा नियुक्ती लागू होईल का ?
शा. नि., सा. प्र. विभाग, दि. २८/३/२००१ नुसार दि. ३१/१२/२००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय नाही.
13.दिवंगत शासकीय कर्मचा–याचा मुलगा अज्ञान असल्यास त्याला अनुकंपा नियुक्ती देता येईल का ?
शा. नि., सा. प्र. विभाग, दि. १९/९/१९९६ नुसार अज्ञान उमेदवाराने सज्ञान झाल्यावर म्हणजे त्याच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर एक वर्षाच्या आत अनुकंपा नियुक्तीसाठी परिपूर्ण अर्ज सादर केल्यास त्याचे नांव परिपूर्ण अर्ज सादर केल्याच्या दिनांकास अनुकंपाधारकांच्या प्रतीक्षासूचीमध्ये घेण्यात यावे.
14.कार्यालयात गट क ‘ ची एकूण १३ पदे रिक्त असल्यास प्रतीक्षासूचीवरील एका उमेदवारास अनुकंपानियुक्ती देता येईल का ?
शा. नि., सा. प्र. विभाग, दि. १/३/२००४ नुसार प्रतीवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या १०% पदे अनुकंपा नियुक्तीने भरता येतात. तसेच ही मर्यादा सन २०१२ पासून लागू आहे. उदाहरणार्थ एखाद्या संवर्गातील किमान ५ पदे सन २०१२, २०१३ किंवा सन २०१४ या कोणत्याही एका वर्षात (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर) रिक्त झाली असल्यास प्रतीक्षासूचीतील एका उमेदवारास म्हणजे प्रथम क्रमांकावरील उमेदवारास अनुकंपा नियुक्ती देता येईल. परंतु रिक्त पदे (मागील वर्षातील पुढे चालू) याप्रमाणे एकूण रिक्त पदे एकत्र करुन त्याच्या १०% इतकी पदे अनुकंपा नियुक्तीने भरता येणार नाहीत.
प्रश्न क्र. १5. अनुकंपा नियुक्ती २०१४ वर्षातील प्रत्यक्ष रिक्त झालेली पदे तसेच संभाव्य रिक्त पदे एकत्रित करुन
त्याच्या १०% पदे अनुकंपा नियुक्तीने भरता येतील का ?
होय. प्रत्येक वर्षात रिक्त झालेल्या व रिक्त होणाऱ्या संभाव्य पदांची एकत्रित गणना करुन त्याच्या १०% इतकी पदे अनुकंपा नियुक्तीने भरता येतील.
प्रश्न क्र. १6. नियुक्तीपासून ६ महिन्यांच्या कालावधीत टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करु न शकल्यास संबंधित उमेदवारास हे प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देता येईल का ?
अनुकंपा तत्वावर नियुक्ती झालेल्या उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र ६ महिन्यात सादर न केल्यास त्या उमेदवाराच्या सेवा संपुष्टात आणण्याच्या सूचना शा. नि., सा. प्र. वि., दि. ६/१२/२०१० अन्वये दिल्या आहेत. जर एखाद्या उमेदवारास नियुक्तीपासून ६ महिन्यात टंकलेखन परीक्षेची एकही संधी मिळाली नाही तर, नियुक्तीपासून प्रथम संधी मिळून त्याचा निकाल जाहीर होईपर्यंत त्या उमेदवारास मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ सचिव समितीसमोर सादर करण्यासाठी विभागाच्या सचिवांच्या मान्यतेने सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावा.
जर उमेदवारास नियुक्तीपासून परीक्षेची एक संधी मिळूनही त्याने हे प्रमाणपत्र ६ महिन्यात सादर न केल्यास त्या उमेदवाराच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात. अशा सेवा समाप्त केलेल्या उमेदवारास शा. नि., सा. प्र. वि., दि. ८/९/१९९७ मधील तरतुदीनुसार गट ड ‘ मधील नियुक्तीसाठी पदांची उपलब्धता विचारात घेऊन नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करावी.
प्रश्न क्र. १7. विहीत कालावधीत संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर न केल्यास सेवा संपुष्टात आणलेल्या अनुकंपा तत्वावर नियुक्ती झालेल्या उमेदवारास गट ड’ मध्ये नव्याने नियुक्ती देता येईल का ?
शा.नि.सा.प्र.वि, दि. ९.८.१९९७ मधील तरतुदीनंतर विहित कालावधीत टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर न करु शकणा-या अनुकंपाधारक उमेदवारांना गट ड मध्ये नव्याने नियुक्ती देण्याची तरतूद आहे. तथापि संगणक अर्हता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर करु न शकणा-या उमेदवारांना पुन्हा नव्याने गट ड मध्ये नियुक्ती देण्याची तरतूद नाही.
प्रश्न क्र. १8. दि. २२/८/२००५ पूर्वीच्या प्रतीक्षासूचीतील उमेदवारांना अनुकंपा नियुक्तीसाठी असलेली कमाल वयोमर्यादा लागू आहे का ?
शा. नि., सा. प्र. विभाग, दि. २८/३/२००१ नुसार दि. ३१/१२/२००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचा-याच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय नाही.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !